'नरेंद्र मोदी, अमित शहांनी भारताचा पोलादीपणा कायम असल्याचे जगाला दाखवून दिले'


वेब टीम : मुंबई
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. अमित शाह यांनी घोषणा करताना कलम ३७० मधील अनुच्छेद क्रमांक एक वगळून इतर सर्व अनुच्छेद हटवण्यात येतील अशी घोषणा केली.

यासोबतच अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेचा महत्त्वाचा प्रस्तावही राज्यसभेत सादर केला. एकीकडे विरोधक या निर्णयाला विरोध करत असताना, मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. निर्णयाचं स्वागत करताना शिवसेना भवानात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना सांगितलं की, “हा खरंच एक ऐतिहासिक दिवस आहे. इतके दिवस जे स्वप्न या देशातला प्रत्येक नागरिक ह्दयाशी बाळगून होता ते पूर्ण झालं आहे”. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली. त्यांचंही हे स्वप्न होतं, जे पूर्ण झालं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं अभिनंदन करताना पोलादीपणा कायम आहे हे जगाला जाणवून दिलं असल्याचं म्हणत कौतूक केलं. पुढे त्यांनी म्हटलं की, “१५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन आहे. मात्र आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला. ज्या बेड्या शिल्लक होत्या त्या या सरकारने आज तोडून टाकल्या आहेत”.

उद्धव ठाकरेंनी विरोध करणाऱ्यांना आवाहन करताना राजकीय जोडे बाजूला ठेवून देशाच्या सार्वभौमत्वाला महत्त्व द्यावं असं आवाहन केलं आहे. “सार्वभौमत्वाच्या बाबतीत तडजोड होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी दक्षता घेऊ. हा निर्णय कोणत्या एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून, आपल्या देशाच्या एकसंघपणासाठी महत्त्वाचा आहे. त्याचं आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे”, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं. आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post