बाहेरचे नेतृत्व नगरकर स्वीकारणार नाहीत - ना. विखे यांचा रोहित पवारांवर निशाणा


वेब टीम : अहमदनगर
नगर जिल्ह्यात सक्षम नेतृत्व आहे.नेतृत्वासाठी जिल्ह्यास बाहेरच्यांची आवश्यकता नाही.बाहेरचे नेतृत्व नगरकर स्वीकारणार नाहीत. या शब्दात नामोल्लेख न करता ना. विखे-पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यावर अपरोक्षपणे टीकास्त्र सोडले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृहनिर्माणमंत्री विखे पाटील यांनी कुकडी, मुळा, वांबोरी चारी, सीना प्रकल्प आदीच्या पाणीवाटपाचा संदर्भातील आढावा बैठक आयोजित केली होती. ही बैठक संपन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक कक्षात गृहनिर्माणमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला.

विखे पाटील म्हणाले, कुकडी प्रकल्पातील ८० टक्के लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात आहे. नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि प्रकल्पाचे काम सुविधेने होण्यासाठी या प्रकल्पाचे सर्कल ऑफिस नगर जिल्ह्यात असणे गरजेचे आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील यास ग्रीन सिग्नल दिला आहे.

मुळातच कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या बाबतीत नगरकरांच्या हक्काच्या पाण्यावर नेहमीच गदा आली असून अन्याय झाला. कृष्णा खोऱ्यात समावेश झाला खरा, मात्र प्रकल्प अपूर्ण ठेवून शेवटी अन्यायच केला. जिल्ह्यावर झालेला हा अन्याय दूर करण्यासाठी आता प्रयत्न करणे, सिंचन प्रकल्प पूर्ण करणे,उद्योगांचा विस्तार करणे हे गरजेचे आहे.

जिल्हा विभाजनाच्या मुद्दा संदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले, जिल्हा विभाजनाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, त्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही, मात्र इतरही अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते प्रश्न मार्गी लावणे अधिक महत्त्वाचे आहे.असे विखे पाटील म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post