झोमॅटो गर्लची पोलिसांवर दबंगाई; अर्वाच्च भाषेत शिवीगाळ (व्हिडीओ)


वेब टीम : मुंबई
वाहतूक पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, हुज्जत घालून कारवाईपासून रोखणे आणि सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी करणाऱ्या महिलेविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रियंका राजेश मोगरे असे त्या महिलेचे नाव आहे. ८ ऑगस्ट रोजी प्रियंका मोगरे या महिलेने वाशीमध्ये पोलिसांसोबत गैरवर्तन केले होते. या प्रकारानंतर प्रियंकाने पोलीस ठाण्यात येऊन वाहतूक पोलिसांची माफी मागितली होती. त्यामुळे पोलिसांनी महिलेस सोडले होते.

मात्र त्यानंतर प्रियंका मोगरे हिने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांची बदनामी केल्याने पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला ताब्यात घेतले आहे..

प्रियंका मोगरे ही झोमाटोच्या माध्यमातून फूड डिलिव्हरीचे काम करत असून ८ ऑगस्ट रोजी ती वाशी सेक्टर-१७ मध्ये फूड डिलिव्हरी करण्यासाठी आली होती. त्यावेळी आपली मोटारसायकल नो पार्किंग क्षेत्रात उभी केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तिच्या मोटारसायकलचा ई-चलन मशीनद्वारे फोटो काढून कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

मात्र या गोष्टीचा राग आल्याने प्रियंकाने वाहतूक पोलिसाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर प्रियंकाने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेऊन पळ काढला. त्यामुळे या वाहतूक पोलिसाने दुसऱ्या मोबाईल फोनवरून आपल्या सहकाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन महिला कॉन्स्टेबलला मदतीसाठी घेऊन येण्यास सांगितले.


त्यानंतर मदतीसाठी आलेल्या पोलिसांनी प्रियंकाचा पाठलाग करून तिला वाशीतील शिवसेंटर येथे अडवले. त्यानंतर तिने वाहतूक पोलिसाचा मोबाईल फोन फेकून देऊन महिला पोलीस कॉन्स्टेबलला कट मारून त्या ठिकाणावरून पुन्हा पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी तिचा पाठलाग करून तिला पामबीच मार्गावर अडवल्यानंतर प्रियंकाने पुन्हा पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे एका वाहतूक पोलिसाने तिचे मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. याचवेळी त्याठिकाणी आलेल्या व्यक्तीने पोलिसांचे मोबाईलवरून चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.

यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीला शूटिंग न करण्यास सांगितल्यानंतर देखील त्याने चित्रीकरण चालूच ठेवले. यावेळी प्रियंकाने हे पोलीस चोर असल्याचे व गाडीजवळ असताना फाईन मारत असल्याचे बोलून त्या व्यक्तीला शूटिंग काढण्यास उत्तेजन दिले..

त्यामुळे पोलिसांनी प्रियंकाला वाशी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर तिने सर्व पोलिसांची माफी मागितल्याने वाहतूक पोलिसांनी प्रियंकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून तिला सोडून दिले. मात्र या घटनेनंतर प्रियंकाने पोलिसांची बदनामी करण्याच्या उद्देशाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालताना व त्यांना शिवीगाळ करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रियंका विरोधात पुन्हा तक्रार दाखल केल्यावर वाशी पोलिसांनी प्रियंकावर गुन्हा दाखल केला आहे..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post