नगर शहरातील गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार : कळमकर


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार कार्यकर्ता मेळावा आटोपून जात असताना काही गुंडांनी मला धक्काबुक्की करत अंगावर चपला फेकण्याचा प्रकार केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास 'त्या' गुंडांची गुंडगिरी खपवून घेणार नसून त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान आपण संस्कारी असून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष आदेश देईल तो मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंगळवारपासून पक्षबांधणीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रभर दौरा सुरू केला आहे. शनिवारी नंदनवन लॉन्स येथे त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. हा कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर ते जात असताना काही गुंडांनी मला धक्काबुक्की करत अंगावर चपला फेकण्याचा प्रकार केला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या गुंडांना माझे कार्यकर्ते उत्तर देऊ शकत होते, परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेसचा निष्ठावंत आहे. पक्ष आदेश मानणार आहे. माझ्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. त्यामुळे आम्ही कोणताही अनुचित प्रकार केला नाही, परंतु यापुढे असा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या गुंडांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा माजी महापौर कळमकर यांनी दिला. कालच्या घटनेचे मी भांडवल करणार नाही. परंतु त्या गुंडांनी यापुढे याद राखावे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल असेही कळमकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान नगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादी कडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे समर्थक उमेदवारी वर दावा करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post