विधानसभेनंतर नगरला होणार उड्डाणपूल ; खा. सुजय विखे


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा त्या कामात व्यस्त झाल्याने नगरमधील उड्डाणपुलाच्या कामास थोडा विलंब होत आहे. मात्र, उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यासाठीची सर्व तांत्रिक प्रक्रीया पूर्ण झालेली आहे. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर उड्डाणपुलाचे काम तत्काळ सुरु होईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी विखे पाटील यांनी दिलेली आश्‍वासने नककीच पूर्ण होतील. त्यात नगरमधील उड्डाणपुलाच्या कामास प्राधान्य असेल. हे काम पुढील दोन वर्षांत नक्कीच पूर्ण होईल, असे आश्‍वासन नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीनंतर खासदार डॉ. विखे पाटील यांनी प्रथमच सावेडी येथील जॉगींग ट्रॅकच्या मैदानावर सकाळी व्यायाम करणार्‍या विविध ग्रुपसोबत संवाद केला. सुप्रभात ग्रुपतर्फे संस्थापक अध्यक्ष अनिल वाबळे व अध्यक्ष रमेश पळसे तसेच स्वानंदी हास्य कल्बतर्फे संचालक छाया बंडकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. मैदानावरील विविध ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, नागरीकांना व्यायामाची नितांत गरज आहे. त्यासाठी शहरातील मैदाने सुसज्ज असायलाच हवीत. नगरमधील जॉगींग ट्रॅकचे मैदान चांगली उपलब्धी आहे. या मैदानाचा आणखी विकास करण्यासाठी नवा ‘डिपीआर’ तयार करु. त्यासाठी तज्ज्ञांची मतेही विचारात घेऊ. येथे आणखी सुविधा कशा वाढवता येतील, त्याचा प्राधान्याने विचार करु. निधीची चिंता करु नका. मैदानाच्या विकासासाठी भरिव निधी सरकारकडून व्यवस्था करुन दिला जाईल. जॉगिंग ट्रॅकप्रमाणेच वाडीया पार्कमध्येही व्यायामासाठी येणार्‍या नगरकरांना सुविधा देण्याचा प्रयत्न असेल.’’

सुप्रभात ग्रुपतर्फे मैदानावर ओपन जीमची व ट्रॅकवरील अन्य सुविधांबाबतच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. वन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी सुरेश दौंड यांनी स्वागत केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे यांना आभार मानले. सुप्रभात ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य व विखे पाटील फाऊंडेशनचे संचालक डॉ. पांडूरंग गायकवाड यांनी या कार्यक्रमांचे नियोजन केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post