वेब टीम : अहमदनगर राजकारणातील चतुरस्त्र व्यक्तीमत्व आणि तत्वनिष्ठ राजकारण, सहकार, साहित्य, शिक्षण, सिंचन अशा विविध क्षेत्रात योगदान असण...
वेब टीम : अहमदनगर
राजकारणातील चतुरस्त्र व्यक्तीमत्व आणि तत्वनिष्ठ राजकारण, सहकार, साहित्य, शिक्षण, सिंचन अशा विविध क्षेत्रात योगदान असणारे माजी मंत्री बी.जे.खताळ पाटील यांचे सोमवारी पहाटे 2 वाजून 10 मिनीटांनी निधन झाले.
संगमनेर येथील राहात्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 101 वर्षाचे होते. सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर संगमनेर अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगमनेत तालुक्यातील धांदरफळ येथे 16 मार्च 1919 रोजी त्यांचा जन्म झाला. त्याकाळी नामांकित वकील म्हणून नावलौकीक होता. 1952 मध्ये त्यांनी संगमनेर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढविली. तत्कालीन मातब्बर नेते दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
1962 मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. तत्पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या भुमिकेला पाठींबा देण्यासाठी त्यांनी 1957 ची निवडणूक लढविण्यास पक्षाला नकार दिला होता. संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना उभारणीची पायाभरणीही त्यांनीच केली.
1985 पर्यंत त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. राज्याची विविध मंत्रालये त्यांनी हाताळली. सिंचन क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या काळात राज्यात अनेक मोठ्या धरणांची निर्मिती झाली.