भाजपच्या मुलाखतींना शक्ती प्रदर्शन नको; जिल्हाध्यक्षांची सक्त ताकीद


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 3 सप्टेंबर ऐवजी बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत.

या मुलाखतीवेळी इच्छुक उमेदवारांनी कोणतेही शिष्टमंडळ अथवा लवाजमा आणून शक्तिप्रदर्शन करू नये, अशी सूचना पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

मुलाखतीसाठी येताना केवळ उमेदवाराने एकट्याने यावे, शक्तिप्रदर्शन करू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मुलाखती पक्ष कार्यालयात नव्हे तर एका हॉटेलमध्ये होणार आहेत. राज्यातील सर्व 288 जागांवरील इच्छुकांची माहिती भाजप घेत आहे. सर्व मतदारसंघातील इच्छुकांची नावे संकलित केली जात आहेत.

नगर जिल्ह्यातील अशा बारा मतदारसंघातील इच्छुकांची माहिती मुलाखतीतून संकलित करण्यासाठी प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बुधवारी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. ‘एका मतदारसंघासाठी अर्धा तास’ याप्रमाणे मुलाखती घेताना वेळेचे नियोजन करण्यात आले आहे.

नेवासा, अकोले, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी व श्रीरामपूर या जिल्ह्याच्या उत्तर भागातील सहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या सर्वात प्रथम मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथडी, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी व नगर शहर या सहा विधानसभा मतदारसंघातील मुलाखती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post