चाळीसगावात भाजपच्या उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच


वेब टीम : जळगाव
मागील ५ विधानसभेचे निकाल पाहता सलग ३ वेळा हा मतदार संघ राखीव असतांना प्रा. साहेबराव सीताराम घोडे निवडून आले आहेत. त्यानंतर मात्र भाजपाचे वाडीलाल राठोड यांचा पराभव करून हा मतदार संघ राष्ट्रवादीने ताब्यात घेतला होता.

राजीव देशमुख यांनी राठोड यांचा २००९ च्या निवडणुकीत पराभव केल्यावर मात्र २०१४ साली झालेल्या निवडणुकीत बेलगंगा सहकारी साखर कारखाना हा कळीचा मुद्दा हातात घेऊन उन्मेश पाटील यांनी राजीव देशमुख यांचा २२ हजार ५०० मतांनी पराभव केला होता.

या चाळीसगाव विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीत अनेक मातब्बर मंडळी इच्छुक असून संपदाताई पाटील व चित्रसेन पाटील हे दोघे उमेदवार भाजपाच्या सव्र्हेत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. .

बेलगंगा साखर कारखाना दीर्घ मुदतीने भाड्याने द्यावा, त्याला लिलावात काढू नये यासाठी उन्मेश पाटील यांनी रचनात्मक आंदोलन केले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

कुठलीही निवडणूक असली की, बेलगंगा हा मुद्दा राजकारणी डोळ्यासमोर ठेवून मते मागत असत; आता मात्र हा मुद्दा पूर्णपणे चित्रसेन पाटील यांनी 'हायजॅक' केल्याने यावेळी तालुक्याचे राजकारण बेलगंगा हा मुद्दा घेऊन इतर कुणी निवडणूक लढवू शकत नाहीत. मात्र, चित्रसेन पाटील यांनी लयास गेलेला बेलगंगा सुरू करून शेतकरी उस उत्पादक यांना दिलासा दिला आहे.

इतर कारखाने कवडीमोल भावात ऊस खरेदी करीत होते. गळीत हंगाम सुरू करून २ हजार रुपये इतका भाव ऊस उत्पादक वर्गाला देऊन त्यांनी तालुक्यात त्यांची एक वेगळी इमेज उभी केली आहे.

निवडणुका आल्या की, निवडणूक लढवण्यासाठी साम,दाम,दंड,भेद, या नितिचा वापर होत असतो. ज्यांचे तालुक्यासाठी योगदान नाही, तेदेखील उमेदवारी मिळावी, म्हणून प्रयत्न करीत असतात. लोकशाहीने सर्वांना उभे राहण्याचा अधिकारदेखील दिला आहे.

मात्र, केवळ पैसा, करमणुकीचे कार्यक्रम घेऊन पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार नाही, असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नुकतेच केले आहे. भाजपाकडून जवळपास २ डझन उमेदवारानी मुलाखती दिल्या आहेत.

त्यात खा. उन्मेश पाटील यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील व चित्रसेन पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. उन्मेश पाटील यांचे आमदार म्हणून तालुक्यासाठी मोठे योगदान आहे, तर संपदा पाटीलदेखील गेल्या अनेक दिवसापासून सामजिक कामात सक्रिय आहेत.

मात्र, बेलगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी चित्रसेन पाटील यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी कामगार आणि त्यांनी शहरातील व्यवसायिकांना एकत्रित आणून बांधलेली मोट त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

याबाबी पक्षाने अधोरेखित केल्यास चित्रसेन पाटील भाजपा २०१९ चे उमेदवार असतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मात्र, संपदा पाटील यांच्यासाठी भाजपाचा मोठा गट सक्रिय आहे.

मात्र, खासदार म्हणून उन्मेश पाटील निवडून आल्यावर त्यांच्या सौभाग्यवती संपदाताई पाटील यांना पक्ष उमेदवारी देईल का? एका घरात खासदार आणि आमदार अशी दोन्ही पदे भाजपा देते किंवा इतर उमेदवाराला भाजपा पक्षश्रेष्ठी संधी देईल हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post