बारामतीच्या मैदानात होणार क्रिकेटचे सामने


वेब टीम : मुंबई
बारामतीत आता क्रिकेटची फटकेबाजी रांगणार आहे. बारामतीमधल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाला बीसीसीआयने राज्यस्तरीय आणि रणजी सामने खेळण्यासाठी मान्यता दिली आहे.

येत्या फेब्रुवारी महिन्यात बारामतीमध्ये पहिला रणजी सामना खेळवला जाईल. बीसीसीआयचे अधिकृत क्युरेटर प्रकाश आढाव यांनी बारामतीच्या मैदानाला भेट देऊन, मैदान रणजी सामन्यांसाठी योग्य असल्याचा अभिप्राय दिला.

यानंतर बारामतीच्या मैदानाला बीसीसीआयकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे एप्रिल २०१६मध्येच सचिन तेंडुलकरच्या हस्ते लोकार्पण झाले होते. जवळपास चार वर्षांनी बीसीसीआयने मैदानाला अधिकृत मान्यता दिली आहे.

१२ ते १५ फेब्रुवारी २०२० रोजी महाराष्ट्र आणि उत्तराखंडचा संघ बारामतीच्या मैदानावर रणजी सामना खेळतील. अनंत चतुर्दशीनंतर मैदानावर निवड चाचणीचे सामने खेळवले जातील.

त्यामुळे येत्या रणजी मोसमात केदार जाधव, राहुल त्रिपाठी, अंकित बावणे या खेळाडूंचा खेळ बारामतीकरांना पहायला मिळणार आहे.

या मैदानावरचा पहिला प्रथमश्रेणी सामना १७ ऑक्टोबरला होईल. महाराष्ट्र आणि सौराष्ट्र संघ विजय मर्चंट चषकाचा तीन दिवसीय सामना खेळतील.

यानंतर १८ ते २१ जानेवारी २०२० दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध मुंबई हा कुचबिहार करंडकाचा ४ दिवसीय सामनाही याच मैदानावर खेळवण्यात येतील.

हे सर्व सामने बारामतीकरांना मोफत पहायला मिळणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post