पवारांनी जे पेरलं तेच आता उगवतय : मुख्यमंत्री फडणवीस


वेब टीम : मुंबई
शरद पवार पक्ष निर्माण करण्याचे आणि पक्ष फोडण्याचे राजकारण करायचे. त्यांच्या राजकारणाचं युग आता संपताना दिसत आहे.

मी ‘शरद पवार’ होऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.

 ‘इंडिया टुडे’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी ‘शरद पवार म्हणतात की तुम्ही साखर कारखान्याच्या मालकांना नोटीस दाखवता. तुम्ही आमच्या पक्षात आला नाहीत तर कारवाई करू, हे खरं आहे का?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.

याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवार हेच करत आले आहेत. त्यामुळे त्यांना असंच वाटणार. पण त्यांची आणि आमची राजकारण करण्याची पद्धती वेगळी आहे. पवारांसारखं राजकारण करण्याची आम्हाला काहीही गरज नाही. काळाचा महिमा पाहा, पवारांनी पक्ष बनवले, तोडले, फोडले, बिघडवले. आज त्यांच्या पक्षासोबत तेच होत आहे. त्यांनी जे पेरलं, तेच आता उगवत आहे.’

‘तुम्ही २१ व्या शतकाचे शरद पवार ठराल का?’ असा प्रश्‍न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, ‘मी शरद पवार का होऊ? मी तर देवेंद्र फडणवीसच होईन. माझं स्वतःचं राजकारण आहे, त्यांच्या राजकीय कूटनीतीची मला गरज नाही.

पवारांच्या राजकारणाचं युग आता संपलं आहे, पिढी बदलली आहे. पवारांनी केलेलं राजकारण आता जनता स्वीकारत नाही.’ असंही फडणवीस म्हणाले. भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे आमचे राज्यातील पहिलेच सरकार आहे.

 विरोधक नुसतेच आरोप करतात. मात्र, पुरावे देऊ शकत नाहीत. मी विरोधी बाकांवर असताना पुराव्यानिशी आरोप करायचो. मात्र, तत्कालीन सरकार दुर्लक्ष करत होते. कुठलीही कारवाई केली जात नव्हती, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post