मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाची विश्रांती


वेब टीम : अहमदनगर
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग सोमवारी (दि.16) कमी करण्यात आला असून सायंकाळी तो पूर्णपणे थांबविण्याची शक्यता आहे. मुळा धरणात सध्या 25 हजार 738 दशलक्ष घनफूट (98.99) पाणीसाठा आहे.

धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांच्या पुढे गेल्याने धरणाच्या 11 मोर्‍यातून सुमारे 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. धरणातून जायकवाडीकडे आतापर्यंत 2 हजार 300 दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 2 हजार 200 क्सुसेकने पाण्याचे आवर्तन सुरू होते. याशिवाय डाव्या कालव्यातून 140 क्युसेकने पाण्याचे आवर्तन सुरू होते. मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक घटली आहे. 25 हजार 700 दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याचे धोरण पाटबंधारे खात्याने घेतले आहे. त्यामुळे आवक घटल्याने नदीपात्रात होणारा विसर्ग गेल्या 3 दिवसात घटविला आहे. सोमवारी (दि.16) सकाळी अवघा 500 क्युसेकने विसर्ग सुरु होता. सायंकाळपर्यंत तो पूर्ण बंद होण्याची शक्यता आहे.

मुळा नदीपात्रातून दोनदा पाणी सोडल्यामुळे नदीकाठी असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्राबरोबरच लाभ क्षेत्रावरही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणाचे दोन्ही कालवे बंद आहेत मान्सून परतण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतक यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे. लाभ क्षेत्रावर पाऊस घटल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून 5 हजार दशलक्ष घनफूट पाणी सोडावे लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post