पितृपक्ष : भरणीश्राध्द म्हणजे काय ? भरणी श्राध्द केव्हा करावे ?


वेब टीम : मुंबई
भरणी श्राध्दाविषयी धर्मग्रंथात सुस्पष्ट सूचना देऊन ठेवलेली आहे वास्तविक भरणीश्राध्द हे पितरांना उद्देशून करावयाचे असल्यामुळे पहिल्या वर्षी त्यांचा असंभव असतो. कारण प्रथम वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राध्द होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राध्दांचा अधिकार नसतो. असे असतानाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणीश्राध्द केले जाते, यात शास्त्राज्ञा उल्लंघन होते.

प्रथम वर्षानंतर मात्र भरणीश्राध्द अवश्य करावे. वास्तविक ते दरवर्षी करावे, अशी शास्त्राज्ञा आहे. पण दुराग्रहाने ते एकदाच करणाऱ्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये. ज्यांना जीवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात, अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया, पितृगया, पुष्करतीर्थ, ब्रम्हकपाल इत्यादी तीर्थावरील श्राध्दांचे फळ मिळावे म्हणून भरणीश्राध्द केले जाते. तसेच ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गयादि तीर्थावर श्राध्दे करण्याची तीव्र इच्छा असते, पण आर्थिक ऐपत वा फुरसत यांच्या अभावी ती श्राध्दे करता येणे शक्य नसते, अशा वेळी मृत व्यक्तीस उद्देशून भरणीश्राध्द करावे.

दरवर्षी भरणीश्राध्द केले तर केव्हाही चांगले. निदान ते एकदा तरी करावे. पण ते प्रथम वर्षी न करता वर्षश्राध्दानंतर करावे. दुसऱ्या वर्षी अवश्य करावे. भरणीश्राध्दाप्रमाणेच इतरही मघादि श्राध्दे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षी पासून करावीत. नित्य तर्पणात देखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नांवाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post