हिंदी भाषा कोणावरही थोपवता येणार नाही : रजनीकांत


वेब टीम : चेन्नई
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'एक देश, एक भाषा' अशी भूमिका मांडल्यानंतर सुरू झालेल्या वादात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनीदेखील उडी मारली आहे.

 हिंदी भाषा कोणावरही थोपवता येणार नाही. फक्त दक्षिणेकडील राज्येच नाहीत, तर उत्तर भारतातील अनेक राज्येसुद्धा याचा विरोध करतील, असे परखड मत रजनीकांत यांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी अभिनेते कमल हसन यांनीही शहा यांच्या वक्तव्यावर टीका करताना हिंदी भाषा कोणावरही लादता येणार नसल्याचे म्हटले होते. .

हिंदी भाषेला थोपवले जाऊ नये. कारण संपूर्ण देशामध्ये एका भाषेची कल्पना करणे शक्य नाही. देशाची एकता आणि विकासासाठी एक भाषा असणे चांगले आहे; परंतुदेशात ही बाब शक्य नसल्याने हिंदी भाषेला थोपवले जाऊ नये.

खास करून जर हिंदी भाषेची सक्ती केली गेली तर फक्त तामिळनाडूच नाही, तर कोणतेही दक्षिणात्य राज्य या भाषेचा स्वीकार करणार नाही. इतकेच नाही तर उत्तर भारतातील अनेक राज्येदेखील याचा विरोध करतील, असे स्पष्ट मत रजनीकांत यांनी व्यक्त केले.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार असलेल्या रजनीकांत यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केला आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या शनिवारी अमित शहा यांनी हिंदी भाषा दिनाच्या औचित्यावर बोलताना देशात एका भाषेची गरज व्यक्त केली होती.

एक देश, एक भाषासंबंधीच्या त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांसह दाक्षिणात्य राज्यातील नेत्यांनी शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. तामिळनाडूमध्ये भाजपसोबत असलेल्या अण्णाद्रमुक पक्षानेदेखील याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर द्रमुकने शहा यांच्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनीदेखील कन्नड राज्याची मुख्य भाषा असून, त्यासोबत कुठलीही तडजोड होणार नसल्याचे सांगत शहा यांना घरचा अहेर दिला होता. अभिनेते आणि मक्काल निधी मैयम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनीदेखील शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post