संग्राम जगतापांच ठरलंय; 'या' पक्षाकडून गुरुवारी करणार अर्ज दाखल


वेब टीम : अहमदनगर
नगर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा गोंधळ आज दुपारी संपला. संग्राम जगताप यांच्या घड्याळाशिवाय फिरणार्‍या पोस्ट कालपासून पुन्हा घड्याळ चिन्ह टाकून सोशल मिडियावर फिरु लागल्या.

याशिवाय होणारा मेळावा हा देखील राष्ट्रवादीचाच असणार असल्याचा खुलासा त्यांच्या निकटवर्तीयांनी केल्याने जगताप यांचं ठरल्याचं स्पष्ट झाले आहे.

संग्राम जगताप हे गुरुवारी दि. ३ रोजी आपला अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर होत असतानाच मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

राठोड यांना पक्षाच्या उमेदवारीचा एबी फॉर्मही स्वत: उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा अनिल भैय्या राठोड विरुद्ध संग्राम भैय्या जगताप ही ‘भैय्या विरुद्ध भैय्या’ अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी झाली असताना राजकीय पातळीवर युती- आघाडीच्या घोषणा अद्यापही होणे बाकी आहे.

नगरची जागा आघाडीतील राष्ट्रवादीकडेच असणार हे जवळपास स्पष्ट झाले असून युतीमध्ये नगरची जागा शिवसेनेकडेच राहणार हेही स्पष्ट होत असले तरी शिवसेनेचा उमेदवार कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

माजी मंत्री अनिल राठोड यांना उमेदवारी अंतिम मानली जात असताना त्यांच्या विरोधात उमेदवारीसाठी स्पर्धक तयार झाले असून शिवसेना कोणाला उमेदवारी देते याकडे आता सार्‍यांचेच लक्ष लागून होते. अखेर हा तिढा स्वत: उद्धव ठाकरे यांनी संपविला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post