पक्ष जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार शुक्रवारी नगर मुक्कामी


वेब टीम : अहमदनगर
नेते, खासदार व आमदार सोडून चालल्यामुळे राजकीय अस्तित्व संकटात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरणार आहेत.

पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौर्‍यावर निघणार असून शुक्रवारी (दि.20) ते नगरला मुक्कामी येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

त्यानुसार मंगळवार (दि.17) पासून शरद पवार दौर्‍यावर निघणार आहेत. सोलापुरात पक्षाच्या पदाधिकार्‍यांसोबत त्यांची पहिली बैठक होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर व सातारा जिल्ह्यात बैठका घेऊन ते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजप-शिवसेनेकडे जाणार्‍या पदाधिकार्‍यांना थोपवणे व पक्षात अजूनही असलेल्यांना विश्वास देणे हाच या दौर्‍याचा मुख्य हेतू असल्याचं बोललं जात आहे.

शुक्रवारी (दि.20) जालना आणि औरंगाबाद येथे बैठका घेतल्यानंतर ते नगरला मुक्कामी येणार आहेत. शनिवारी (दि.21) सकाळी 11 वाजता ते नगरमध्ये पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार, पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, नगरसेवकांशी तसेच सहकार क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधणार आहेत.

आ.संग्राम व राहुल जगताप यांच्याबाबत उत्सुकता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. वैभव पिचड व ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. पक्षाचे सध्या आ.संग्राम जगताप व राहुल जगताप हे दोघेच आमदार आहेत. त्यांच्याही पक्षांतराच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीला हे दोघे येणार का? याबाबत उत्सुकता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post