कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ हा संशोधनाचा विषय : शरद पवार


वेब टीम : अहमदनगर
आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागून आज मतदानाच्या तारखा जाहीर झाल्याची माहिती नगरमध्ये आल्यावर मिळाली. आजपासून नव्या संघर्षाला नगर येथून सुरुवात होत असून काळ्या आईशी बेईमानी करणाऱ्या भाजप सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी केले.

विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर खा. पवार राज्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी (दि.२१) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा नगर येथे पार पडला. या मेळाव्यात पवार यांनी निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहूल जगताप, माजी खा. प्रसाद तनपुरे, घनशाम शेलार, माजी आ.नरेंद्र घुले, ॲड. प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मंजूषा गुंड, माजी आ.पांडुरंग अभंग, डॉ. सर्जेराव निमसे, अरुण कडू, किसनराव लोटके, महेबूब शेख, संदीप वर्पे, किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.पवार म्हणाले, भाजप व सेना सरकारच्या काळात राज्यातील १६ हजार शेतकऱ्­यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारने कर्जबुडव्या उद्योगपतींचे ८७ हजार कोटींचे कर्ज स्वत: बॅकेत भरले. आघाडी सरकारमध्ये मी कृषीमंत्री असताना ७१ हजार कोटी रुपयांची सरसकट कर्जमाफी केली होती. या सरकारने मात्र तत्वत: कर्जमाफी घोषित केली, त्याचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला हा संशोधनाचा विषय आहे.

आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे गहू, तांदूळ आणि साखर भारत देश जगाला निर्यात करत होता. आघाडी सरकारच्या काळात कृषी विकास दर ७ टक्के होता तो आज यांच्यामुळे २ टक्क्यांवर येवून पोहोचला आहे. आम्ही सुरू केलेले कारखाने, उद्योगधंदे हे सरकार बंद पाडत आहेत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याची घोषणा फसवी ठरली आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे.

केवळ शरद पवार, काश्मिर, पाकिस्तान या विषयांवरच त्यांची भाषणबाजी सुरू असून काश्मिरमधील ३७० कलम हटवले मग पुर्वेतील ८ राज्यातील ३७१ कलम हटविण्याचा निर्णय का घेतला नाही? असा सवालही त्यांनी केला. केवळ काश्मिरमध्ये विशिष्ट समाजाला टारगेट करुन तर कारवाई केली नाही ना असा सवाल भविष्यात उपस्थित होवू शकतो त्याचे सरकारला उत्तर द्यावे लागेल, असे श्री. पवार म्हणाले.

 आता किल्ल्यात तलवारीऐवजी छमछम आणणार का?
राज्यात आघाडीचे सरकार असताना मुंबईतील डान्स बार स्व. आर.आर.पाटील यांनी गृहमंत्री असताना बंद केले. पण यांनी ते पुन्हा सुरू केले. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ते हॉटेल, लग्नासाठी भाड्याने द्यायला निघाले आहेत. त्यामुळे त्यांना आता किल्ल्यांवर तलवारीऐवजी बार आणि छमछम आणायची आहे का? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित करत सरकारवर टिकास्त्र सोडले. राज्यात सर्वाधिक गुन्हेगारी नागपूरमध्ये असल्याचा अहवाल आहे, मुख्यमंत्री गृहमंत्री असून ते नागपूरचे आहेत. स्वताचे शहर ज्यांना सुरक्षित ठेवता येत नाही ते राज्य काय सुरक्षित ठेवणार असेही पवार म्हणाले.

भाजपचे अशोक भांगरेंचा राष्ट्रवादी प्रवेश
नगरमधील पवार यांच्या सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपचे नेते अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे जि.प.सदस्य किरण लहामटे हेही व्यासपीठावर उपस्थित होते. पिचड विरोधक असलेले भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तर किरण लहामटे हे अकोले येथे होणाऱ्­या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अकोले विधानसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे.


 १४ वर्षे मंत्रीपदे भोगली तेव्हा काय केले....
पवार यांनी या सभेत पक्ष सोडणाऱ्यांवर मिष्किल भाषेत चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले की, अनेक जण माझ्याकडे यायचे अन म्हणायचे की खुप वाईट झालं...आमच्या संस्थेच्या चौकशीची नोटीस आली आहे, आम्हाला जावे लागेल. तेव्हा चुकीची कामे केली तर ईडी मागे लागणारच. तर अनेकांनी विकासासाठी पक्षांतर करत असल्याचे म्हटले. तेव्हा १४ वर्षे मंत्रीपदे अन विविध पदे भोगली तेव्हा काय केले असे हातवारे करत पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post