शिवसेनेच्या नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या 18 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मुलाखती


वेब टीम : अहमदनगर
भाजप, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेतही विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत होणार्‍या या मुलाखतीसाठी नगरच्या इच्छुकांना 18 सप्टेंबर ही बोलावण्यात आले आहे. नगरमध्ये शिवसेनेत प्रथमच उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाल्याने मुलाखतीला कोण कोण जाणार, याबाबत उत्सुकता आहे. हिच स्थिती जिल्ह्यातील इतर मतदारसंघांची आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होणार असे बोलले जात असले तरी, शिवसेनेने राज्यभरातील इच्छुकांच्या मंगळवार (दि.10) पासून मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. दि.20 सप्टेंबर पर्यंत शिवसेना नेत्यांचे पॅनल या मुलाखती घेणार आहे. दि.18 सप्टेंबरला नगरसह नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावमधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्याबरोबरच नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पत्नी व माजी महापौर शीलाताई शिंदे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनीही उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे. राठोड हे मुलाखतीला जाणारच आहेत, पण शिंदे, कदम, बोराटे यांच्याबरोबरीने आणखी कोण मुलाखत देणार याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

शिवसेनेचे नेते व माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा. हेमंत पाटील, डॉ. दीपक सावंत, अमोल किर्तीकर, वरूण देसाई, किशोरी पेंडणेकर आदी या मुलाखती घेणार आहेत.

शहरातील शिवसेना म्हणजेच राठोड असे मानले जात होते. त्यांच्या नावाला पक्षातून कधीच विरोध झाला नाही किंवा त्यांना कोण स्पर्धकही उभा राहिला नाही. यावेळी मात्र राठोड यांचे समर्थक असलेलेच ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी पत्नीसाठी आणि दुसरे समर्थक असलेले माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी स्वतःसाठी उमेदवारी मागितली आहे. तर नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनीही उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे उपनेते राठोड यांना स्पर्धक निर्माण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post