बांगलादेशच्या गोळीबारात एक जवान हुतात्मा, एक जखमी


वेब टीम : पश्चिम बंगाल
बांगलादेशच्या सैनिकांनी पश्चिम बंगालमध्ये किरकोळ वादावरुन केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान हुतात्मा झाला आहे तर एक जवान जखमी झाला आहे.

पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर गुरुवारी फ्लॅग मीटिंग दरम्यान गोळीबाराची घटना घडली. मच्छीमारांना पकडण्यावरुन झालेल्या किरकोळ वादातून बांगलादेशच्या बॉर्डर गार्डने (बीबीजी) एके-४७ रायफलमधून थेट गोळीबार केला.


काकमारीचार सीमा चौकीच्या अंतर्गत हा प्रकार घडला. बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेच्या अंतर्गत येणाऱ्या पद्मना नदीमध्ये तीन मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी दिली होती. या नदीमध्ये मोठया प्रमाणावर हिल्सा मासे पकडता येतात.

परंतु बांगलादेशच्या बीजीबी पथकाने या तीन मच्छीमारांना ताब्यात घेतले. त्यामुळे वादाला तोंड फुटले. त्यानंतर बीजीबीने दोन मच्छीमारांना जाऊ दिले पण तिसऱ्याला आपल्या ताब्यातच ठेवले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीएसएफच्या ११७ व्या बटालियनचे अधिकारी सहा जवानांसह मोटार बोट घेऊन वाद सोडवण्यासाठी गेले. परंतु, बांगलादेशच्या सैनिकांची आक्रमकता पाहून ते माघारी फिरले. त्याचवेळी सय्यद नावाच्या बीजीबी सैनिकाने पाठीमागून गोळीबार केला.

यामध्ये बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल विजय भान सिंह यांच्या डोक्यामध्ये तर कॉन्स्टेबल राजवीर यादव यांच्या हाताला गोळी लागली. दुर्देवाने विजय भान यांचा बोटीमध्येच मृत्यू झाला.

तर राजवीर यादव जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

भारत आणि बांगलादेशला ४,०९६ किलोमीटरची सीमा आहे. दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये चांगले संबंध आहेत. गेल्या अनेक दशकांपासून दोन्ही देशांमधून गोळीबाराची एकही घटना घडलेली नव्हती. भारताने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला बीएसएफने या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

तसेच या घटनेनंतर बीएसएफचे प्रमुख व्ही.के.जोहरी यांनी बीजीबीचे प्रमुख मेजर जनरल शफीनुल इस्लाम यांच्याबरोबर हॉटलाइनवरुन चर्चा केली आहे. बीजीबीने सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post