दिल्लीगेट रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम 3 दिवसात सुरू करणार – महापौर बाबासाहेब वाकळे


वेब टीम : अहमदनगर
शहरामध्ये गणेशोत्सवापासून पाउस पडत आहे. त्यामुळे बर्‍याच भागातील रस्ते खराब झाले आहेत, परंतु पाऊस पडत असल्यामुळे बर्‍याच भागातील रस्ते मंजूर असूनदेखील रस्त्याचे काम करण्यास अडचण येत आहे.

दिल्लीगेट ते न्यू लॉ कॉलेजपर्यतचा रस्ता खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यास त्रास होत आहे. याकरिता सदर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासंबंधित अधिकारी यांची बैठक महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतली.

या बैठकीत सदर काम येत्या 3 दिवसांत सुरु करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, अजय ढोणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री.राऊत, अभियंता श्री.राजभोज, शहर अभियंता व्ही. जी.सोनटक्के, पाणी पुरवठा विभागप्रमुख श्री.काकडे, अभियंता श्री.निंबाळकर, श्री.पारखे, श्री.खंडागळे, ठेकेदार रसिक कोठारी आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, दिल्लीगेटचा रस्ता उपनगराला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यास त्रास होत आहे. सदरचा रस्ता 10 कोटीच्या निधीमध्ये मंजूर असून, कार्यारंभ आदेशदेखील देण्यात आलेला आहे.

तरी देखील कामास सुरूवात करण्यात आली नाही. याबाबत संबंधित ठेकेदार यांना सदरचा रस्ता तीन दिवसात सुरू करण्यााच्या सूचना देण्यात आल्या. रस्त्याचेही काम तीन दिवसात सुरू न केल्यास संबंधित ठेकेदार यांना नोटीस देवून काम रद्द करण्याचे व काळया यादीत टाकणेबाबत कार्यवाही करण्याच्या कार्यकारी अभियंता यांना सूचना देण्यात आल्या.

काम चांगल्या दर्जाचे करणे व नागरिकांना त्रास होणार नाही, यादृष्टिने एका बाजूने रस्याचे काम सुरू करण्यास आदेश दिले. तसेच शासनाच्या 10 कोटीच्या निधीमधून शहरातील प्रमुख रस्ते मंजूर करण्यात आलेले आहेत. ते कामदेखील लवकरच सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपमहापौर सौ. मालनताई ढोणे म्हणाल्या की, हा रस्ता खराब झाल्यामुळे नागरिक व परिसरातील दुकानदार वारंवार माझेकडे व नगरसेविका सौ.सुप्रिया जाधव यांचेकडे रस्ता करणेबाबत मागणी करित आहेत.

रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याच्या सूचना महापौरांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होणार आहे तसेच पोलिस हेडक्वॉटर अंतर्गत भागामध्ये नागरी समस्या मोठया प्रमाणात आहेत.

त्या ठिकाणी लाईट, ड्रेनेज, गटार, रस्ते आदी कामे होण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे यादेखील समस्या लवकरच सोडविण्याच्या दृष्टिने महापौरांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post