मयांक पुन्हा चमकला; कोहली, पुजाराची अर्धशतके


वेब टीम : पुणे
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी चांगलाच गाजवला. सलामीवीर मयांक अग्रवालने शतक झळकवत पुन्हा चमकदार कामगिरी केली.

चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांनीही अर्धशतके करत भारतीय डावाला आकार दिला. दिवसअखेर भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात २७३ धावा केल्या.

पुण्यातील गहुंजे येथील मैदानावर दुसऱ्या कसोटीस सुरुवात झाली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मागच्या सामन्यात दोन्ही डावांत शतक करणारा रोहित शर्मा आणि द्विशतक झळकावणारा मयांक अग्रवाल यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. रोहित ३५ चेंडूत १४ धावा करुन तंबूत परतला मात्र त्याने नव्या चेंडूचा उत्तम प्रकारे सामना केला.

मयांकने चेतेश्वर पुजाराला साथीला घेत डावाला आकार दिला. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत १०७ चेंडूत अर्धशतक केले.

त्यानंतर ५८ धावांवर असतानाच तो बाद झाला. त्याचे हे २२वे कसोटी अर्धशतक होते. त्यानंतर अग्रवालने कर्णधार कोहलीच्या साथीत धावगतीला जोर दिला.

८७ धावांवर खेळत असताना अग्रवालने केशव महाराजला सलग दोन षटकार खेचत ९९ धावसंख्या गाठली. त्यानंतर फिलँडरला चौकार मारत त्याने शतक साजरे केले.

अग्रवाल आणखी एक मोठी खेळी करतो का काय असे वाटत असतानाच १०८ धावांवर तो बाद झाला. अवघ्या एका धावेवर असताना जीवदान मिळालेल्या कोहलीने ९१ चेंडूत आपले २३वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.

रहाणे-कोहली या कर्णधार-उपकर्णधार जोडीने दिवस संपेपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. खेळ थांबला तेव्हा कोहली ६३ तर रहाणे १८ धावांवर खेळत होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post