राष्ट्रवादीमधील चांडाळ चौकडीच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश


वेब टीम : पुणे
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील चार-पाच नेत्यांची चौकडीच आपसांत पदांचे वाटप करत असल्याचा आरोप काही महिन्यांपासून सुरू आहे.

आता हेच आरोप उघडपणे करून राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची नावे घेऊन हेच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्याचा कारभार बघत आहेत.

तसेच,आपल्या कुटुंबातच व मित्रांमध्ये पदे वाटून घेत असल्याचा आरोप केला होता.

थोरात हे गेली ५ वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवित आहेत. त्या अगोदर त्यांनी सातवेळा अध्यक्षपद भूषविले आहे.

तसेच ३ ते ४ वेळा विधानसभेची उमेदवारी घेतली आहे. असाच प्रकार माजी आमदार अशोक पवार यांच्याबाबतीत घडला आहे.

पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असताना आमदार झाले. याच दरम्यान त्यांनी खासगी साखर कारखान्याची निर्मिती केली.

अडीच-तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत पवार यांनी पत्नीला उमेदवारी देऊन निवडून आणले आणि त्यानंतर पदाच्या राजकारणात त्यांनी पत्नीला जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतिपद दिले.

इंदापूरमध्ये तिसर्‍यांदा विधानसभेची निवडणूक लढविणार्‍या दत्तात्रय भरणे यांनी पहिल्या निवडणुकीत आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवली होती.

त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबित केले होते. मात्र लगेचच काही दिवसांनी जिल्हा परिषदेची निवडणूक आली. त्यावेळी भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात घेऊन उमेदवारी दिली.

या निवडणुकीत विजयी झालेल्या भरणे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले.अडीच वर्षे अध्यक्षपद उपभोगल्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि ते निवडून आले.

आता पुन्हा तिसर्‍यांदा विधानसभेची निवडणूक लढवीत आहेत. विशेष म्हणजे भरणे हे गेली २५ वर्षे जिल्हा बँकेचे, तसेच छत्रपती भवानीनगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.

गेली २५ वर्षे विविध पदे उपभोगणार्‍या थोरात-पवार-भरणे यांना पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीची बरीच नेते मंडळी पक्षाबाहेर पडली आहेत.

त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कामठे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे, छत्रपती भवानीनगर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, भीमा-पाटस कारखान्याचे संचालक आनंद थोरात, महेश भागवत यांच्यासह बऱ्याच माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post