त्यांनी २५ वर्षात व्यापार, उद्योग बुडविले : संग्राम जगताप


वेब टीम : अहमदनगर
नगर शहर विकासकामाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शहर आहे. मध्यवर्ती शहर असल्यामुळे शहराचा विकास होणे गरजेचे होते, परंतु त्यासाठी यापूर्वीच्या नेतृत्वाने कधीही प्रयत्न केले नाही. मागील पाच वर्षापासून मी विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. 

नगर शहरात अनुचित प्रकार घडवायचा व नंतर व्यापारी बाजारपेठ बंद करायच्या या प्रकारामुळे ग्रामीण भागातील ग्राहक नगर शहरात खरेदीसाठी येत नव्हता. व्यापाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे काम त्यांनी केले. मी फक्त विकासाचे राजकारण केले आहे. 

आता आपल्याला सर्वांना मिळून नगर शहराचे रुपांतर महानगरामध्ये करायचे आहे. पुणे-नाशिक शहराबरोबर नगरची ओळख निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर व्यापार्‍यांच्या बैठकीत आ.संग्राम जगताप बोलत होते. यावेळी राजेंद्र चोपडा, विशाल शेटीया, डॉ.सचिन भंडारी, कमलेश भंडारी, भूषण भंडारी, नितिन शिंगवी, राजेश भंडारी, मुकुंद धूत, विनोद मालपाणी, भरत जाकोटिया, दिपक बोयटा, अनिल लुंकड, ईश्वर बोरा, सुनिल भंडारी, धनेश कोठारी, राहुल भंडारी, अमित मुथा, प्रशांत मुथा, अविनाश घुले, प्रविण कोठारी, अभय गुजराथी, भाऊसाहेब पांडुळे, सचिन डुंगरवाल, सुरेश धामत आदी उपस्थित होते.


आ.जगताप पुढे म्हणाले, पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडविण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्ताने पोकळ गप्पा मारत आहेत. अशी टीकाही आ.जगताप यांनी केली.


यावेळी बोलताना राजेंद्र चोपडा म्हणाले की, आनंदऋषी महाराजांच्या नावाने हॉस्पिटल उभे राहिले ते फक्त आ.अरुण जगताप यांच्यामुळेच. 

आनंदऋषी महाराजांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास आ.जगताप यांनी केला आहे. नगर शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम त्यांनी केले. व्यापार्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. 

एक तरुण होतकरु मुलगा आमदारकीच्या माध्यमातून शहराचे प्रश्न सोडवित आहे. त्यामुळे सर्व व्यापारी वर्गाने आ.संग्राम जगताप यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post