अनिल राठोडांसह जिल्ह्यात शिवसेनेचे टेन्शन वाढले; 'या' पक्षाने घेतली विरोधात भूमिका


वेब टीम : अहमदनगर
विधान परिषदेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहरासह जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचे पत्रकार परिषदेत आरपीआयचे सचिव अजय साळवे यांनी स्पष्ट केले. महायुतीतील शिवसेना पक्षाने आरपीआयच्या उमेदवारांना जागा न सोडल्याने व आरपीआयच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या भूमिकेमुळे अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेचे उमेदवारांचे जिल्ह्यात टेन्शन वाढले आहे.

 यावेळी शहराध्यक्ष किरण दाभाडे, विजय चाबुकस्वार, अशोक केदारे, रमेश भिंगारदिवे, अविनाश भोसले, संजय कांबळे, सदाभाऊ भिंगारदिवे आदींसह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीमध्ये रिपब्लिकन मताचा फायदा घेत भाजप व शिवसेना केंद्रात व राज्यात सत्तेवर आली. रिपाईच्या युतीमुळे शिवसेना आणि भाजपला भरघोस यश मिळाले. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाईला सत्तेत वाटा देताना शिवसेनेने रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागेच्या उमेदवारांना उमेदवारी नाकारली असून, आरपीआयकार्यकर्ते नाराज असून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीचे स्वप्न पूर्ण केले. परंतु सध्याच्या शिवसेना नेतृत्वाने त्या स्वप्नांना काळिमा फासण्याचे काम केले असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

रिपाइंची युती भाजपासोबत असली तरी महायुतीतील घटक पक्ष शिवसेना रिपाई मताचा वापर निवडणुकीत करून घेत आहे. परंतु रिपाईला जागा देण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास भाजपाकडे बोट दाखवण्यात येते.

त्याचा निषेध म्हणून नगर जिल्ह्यातील आरपीआयचे कार्यकर्ते शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणार असून, नगर जिल्ह्यातील शहरासह पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर येथील शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लवकरच बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आरपीआय विधानसभेची आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याचा इशारा साळवे यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post