कर्जत-जामखेडमध्ये सुजय विखेंचे वक्तव्य राम शिंदेंना भोवले? रोहित पवार विजयी


वेब टीम : अहमदनगर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांचा विजय झाला. भाजपच्या राम शिंदेंच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार सुजय विखे यांनी सभेत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये परत करण्याची विचित्र मागणी केली होती. विखेंचे हेच वक्तव्य राम शिंदे यांना भोवले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील  राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला. येथील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रोहित पवार हे आघाडीवर होते. पुढे ही आघाडी वाढत गेली. प्रचारादरम्यान दोघांनीही मतदारसंघ पिंजून काढला होता. येथे शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले यांच्या सभा झाल्या होत्या.

तर रोहित पवार यांच्यासाठी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांनी सभा घेतल्या होत्या. याशिवाय रोहित पवार हे बाहेरचे पार्सल मागे पाठवा, असे मुख्यमंत्री प्रचारादरम्यान म्हटले होते.

त्यामुळेही या मतदारसंघाची चर्चा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु मतदारांनी रोहित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. विजयानंतर  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post