आदित्यजी, हीच ती वेळ! संधी दवडू नका; सत्यजित तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला


वेब टीम : मुंबई
काँग्रेसकडून शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रह केला जाऊ लागला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना हीच ती वेळ, असे सांगत 'संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही' असा सल्ला दिला आहे.

तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित राजकारणातील 'संधी'संदर्भात स्वानुभव कथन करत आदित्य यांना सल्ला दिला आहे.

काय म्हटलंय फेसबुक पोस्टमध्ये,
2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले.

मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या, असे तांबे यांनी म्हटले आहे.

पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला,  अशा शब्दात तांबे यांनी आपला अनुभव सांगितला आहे.

हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती, असा सल्ला शेवटी तांबे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post