नगरमध्ये 'भैय्याच'; संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी


वेब टीम : अहमदनगर
नगर शहर विधानसभा मदारसंघात पुन्हा एकदा भैय्यांनीच बाजी मारली आहे. अनिल भैय्या आणि संग्राम भैय्या यांच्यात झालेल्या लढतीत संग्राम भैय्या वरचढ ठरले. त्यांनी ११ हजार मतांनी राठोड यांचा पराभव केला. निकालानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी  विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला. जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत.

सकाळी मतमोजणी सुरू झाली, त्यावेळी पहिल्या फेरीपासूनच जगताप आघाडीवर होते. सहाशे मतांपासून सुरू झालेली त्यांची आघाडी दहा हजारापर्यंत पोहोचली होती. मध्य शहरातील मतमोजणी सुरू झाली त्यावेळी जगताप यांची आघाडी तब्बल पाच हजार मतांनी घटली होती.मात्र सारसनगर, केडगाव, रेल्वे स्टेशन रोड  भागात जगताप यांना निर्णायक मताधिक्य मिळाले. जगताप यांना ११ हजार ११५ मतांची आघाडी मिळाली आहे.

जगताप यांच्याविरुद्ध राठोड हे दुस-यांदा मैदानात होते. राठोड यांचा सलग दुस-यांदा पराभव झाला.  जगताप यांनी केलेली मोर्चेबांधणी, प्रचारासाठी घेतलेली मेहनत आणि तरुणांमध्ये केलेला संपर्क यामुळे जगताप हे विजयापर्यंत पोहोचले. निकाल लागल्यानंतर जगताप समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी जल्लोष केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post