विखेंसोबतचे मंत्रिपदाचे स्पर्धक पडले : राम शिंदे, कर्डीले, कोल्हे, औटी, मुरकुटे, राठोडांच्या पराभवामागे विखे?


वेब टीम : अहमदनगर
१२ विरुद्ध ० असा नारा नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखेंनी दिला होता. मात्र विधानसभेचे निकाल आले ते उलटेच. भाजपला जिल्ह्यात अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशानंतर जिल्ह्यात चर्चा सुरु झाली ती विखे पॅटर्नची.

भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या पराभवामागे विखेच असल्याचा आरोप आता सुरु झाला आहे. एकंदर परिस्थिती पाहता त्यात काही चुकीचे नाही असेच म्हणावे लागेल. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या विखेंच्या सर्व स्पर्धकांचा पराभव झाल्याने विखेंच्या भूमिकेबाबत जिल्ह्यात जरा जास्तच संशय व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात पहिली मोठी विकेट गेली ती पालकमंत्री राहिलेल्या राम शिंदेंची. तेथे रोहित पवारांनी त्यांचा पराभव केला. याठिकाणी झालेल्या काही सभांमध्ये खासदार सुजय विखेंनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे पवारांना सॉफ्ट कॉर्नर मिळाल्याची चर्चा आता रंगत आहे. तसेच पक्षविरहित स्वतंत्र असलेली विखेंनी यंत्रणा शेवटच्या टप्प्यात शिंदेंच्या मदतीला आलीच नसल्याचा आरोप शिंदे समर्थकांकडून होत आहे.

जिल्ह्यात दुसरा मोठा पराभव झाला तो विधानसभेचे उपसभापती राहिलेल्या विजय औटी यांचा. निलेश लंके तेथे ६० हजार मतांनी निवडून आले. पारनेरमध्ये नगर तालुक्यातील गावात लंके यांना मताधिक्य आहे. पारनेरमध्येही विखे समर्थकांच्या बालेकिल्ल्यात लंके यांना मताधिक्य मिळाले. तेथेही विखेंच्या यंत्रणेने औटींचे काम न केल्याचा आरोप होत आहे.

तिसरा मोठा पराभव हा शिवाजी कर्डिलेंचा झाला. त्यांच्यासाठी सुजय विखेंनी सभा घेतल्या होत्या. विशेष म्हणजे लोकसभेला या मतदारसंघातून विखेंना लीड आहे. नगर व पाथर्डी तालुक्यातही कर्डिलेंची पीछेहाट झाली. राहुरीत विखेंनी यंत्रणा मोठी आहे. असे असतानाही कर्डिलेंचा झालेला पराभव हा त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच की काय सोशल मीडियावर सुजय विखेंच्या निषेधाच्या पोस्ट कर्डीले समर्थकांकडून व्हायरल करण्यात आल्या आहेत.

चौथा मोठा पराभव म्हणजे नगर शहरातून अनिल राठोड यांचा. लोकसभेच्या वेळेस ज्या नगर शहराने सुजय विखेंना ५५ हजारांचे लीड दिले. त्याच नगर शहरात राठोडांचा ११ हजार मतांनी पराभव झाला. सुजय विखेंसाठी लोकसभेला दारोदार फिरलेल्या राठोड यांच्यासाठी मात्र विखेंनी साधी सभाही घेतली नाही. सावेडी उपनगरात एक रॅली काढली तेव्हडेच काय ते नवल. शहरातील भाजप व विखे समर्थकांनी जगतापांना मदत केल्याचे दिसते. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सावेडीतही राठोड मागे पडले.

पाचवा मोठा पराभव म्हणजे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा. नेवाशात प्रमुख विखे समर्थक खुलेआम गडाखांच्या सोबत दिसले. तालुक्यात विखेंच्या यंत्रणेने काम न केल्याचा आरोप मुरकुटे समर्थक सोशल मीडियावर करत आहेत.

सहावा मोठा पराभव म्हणजे स्नेहलता कोल्हे यांचा. अवघ्या ८०० मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे आशुतोष काळे तेथे निवडून आले. त्यांच्या विरोधात राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजने उभे होते. त्यांनी तब्बल १५००० मते घेतली. त्यामुळे कोल्हेंच्या पराजयामागे परजणे असल्याचे स्पष्ट होते. मतदानानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विखेंनी भाजपचे काम केले नसल्याचा आरोप केला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post