मुख्यमंत्र्यांचा शपथविधी; नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष


वेब टीम : अहमदनगर
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याचे समजताच नगर शहर भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लक्ष्मी कारंजा येथील भाजपाच्या कार्यालयात सकाळपासून जल्लोष करण्यास सुरुवात झाली.

ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत व फटाके फोडून भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व भाजपाची सत्ता पुन्हा आल्याचा जल्लोष साजरा केला.

भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांना लाडू भरवून सर्वांचे अभिनंदन केले. उपमहापौर मालन ढोणे व महिला पदाधिकर्‍यांनी फुगडी खेळून पारंपारिक पद्धतीने आनंद साजरा केला.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिंडे, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आदिंसह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने युतीला महाजनादेश दिला होता, मात्र भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने निष्कारण वेगळी भुमिका घेत वेगळी चूल मांडण्याचा विचार केल्याने गेल्या एक महिन्यांपासून राज्यात अस्थिर वातावरण आहे.

होत असलेल्या सर्व घडामोडीवर भारतीय जनता पार्टी लक्ष ठेवून होती. भाजपाच्या गोटात असलेली शांतता ही वादळापूर्वीची शांतता होती. काल सायंकाळनंतर घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजपाची सत्ता आली आहे.

मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच असावे, ही लाखो भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांची साथ मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरीने उपमुख्यमंत्री अजित पवार काम करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोन्ही डायनॉमिक नेते एकत्र आल्याने महाराष्ट्राची प्रगती एक्सप्रेस आता 120 च्या वेगाने पुढे जाईल. गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या विकासकामांना आता मोठी चालना मिळणार असून, महाराष्ट्र देशातील सर्वात अव्वल राज्य होईल. असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post