वेब टीम : अहमदनगर महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात हो...
वेब टीम : अहमदनगर
महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव महासभेत दोन वर्षापुर्वी झालेला आहे. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही.
यासंदर्भात 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्यावतीने सदर पुतळा तातडीने बसविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा चारही नगरसेवकांनी दिला होता. मागील दोन वर्षापुर्वी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मनपाच्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे.
मात्र त्याच्या परवानगीसाठी एवढा मोठा कालावधी निघून गेला आहे. या ठरावाची अंमलबजावणी अद्यापि झाली नसल्याचे कुमार वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. सदर पुतळा बसविण्याची कार्यवाही न झाल्यास चारही नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
यासंदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शनिवारी (दि.2) दुपारी नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, मनोज कोतकर, अजिंक्य बोरकर, संजय घुले, मुन्ना शेख, अभियंता सुरेश इथापे, आर्किटेक्ट शरद लाटे यांच्या समवेत नियोजित जागेची पाहणी करून या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही आर्किटेक्ट शरद लाटे यांना दिल्या.
कार्यालयीन कार्यवाही पूर्ण होताच लवकरात लवकर पुतळ्याचे काम सुरु करण्यात येईल असे महापौर वाकळे यांनी सांगितले.