भाजपच्या ‘मिसकॉल’ सदस्यत्वाच्या राजीनामा सत्रास सुरुवात


वेब टीम : अहमदनगर
मिसकॉलद्वारे सभासदत्व देण्याची मोहिम राबवून भारतीय जनता पक्षाने असंख्य कार्यकर्ते पक्षाबरोबर जोडले. परंतू वाढलेली सभासद संख्या ही पक्षाला आलेले ’बाळसे’ नव्हे तर ’सुज’ होती.

हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. निष्ठावान कार्यकर्ते पक्षासाठी राबत असताना पक्षाने मात्र सत्तेसाठी इतर पक्षातील लोकांना जवळ केले आणि पक्ष विचारांचा नाश झाला आहे.

त्यामुळे नाराज झालेल्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजपच्या मिसकॉल पार्टीचा राजीनामा देत इतर निष्ठावानांनीही राजीनामा द्यावा असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे या मिसकॉल सदस्यत्वाच्या राजीनामा सत्रास नगरमधून सुरुवात झाली आहे.

भाजपचे मिसकॉलद्वारे सदस्यत्व मिळविणार्‍यांमध्ये 40 ते 50 टक्के सदस्यांचा पक्षाशी अप्रत्यक्षात संबंध नाही. त्यामुळे सदस्यांची जी मोठी संख्या दिसली ती म्हणजे केवळ फुगवटा असल्याचे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कारण एवढी मोठी सदस्य संख्या असलेल्या पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील कामगिरी फारशी समाधानकारक नाही.

त्यातच प्रत्यक्ष फिल्डवर्क करणारे भाजपचे कार्यकर्ते यांना अधिक संधी देण्याऐवजी इतर पक्षातून आलेल्या लोकांना जवळ केले गेल्याने भौतिक काम कमी झाले.

केवळ आयटी सेलच्या माध्यमातून पुरेसे काम होत नाही त्यासाठी जनतेत आणि घराघरात जाऊन लोकांचे प्रश्‍न समजावून घेत त्यावर काम करणे अपेक्षित असताना मिसकॉल पार्टीचे कार्यकर्ते कुठेच दिसत नव्हते.

त्यामुळे भाजपच्या मिसकॉल पार्टीचे राजीनामे देण्याचे सत्र सुरु झाले असून नगरमधून पहिला राजीनामा दिला गेला आहे.

राजीनामा देऊन जून्या भाजपची जडण-घडण करण्याचा मनोदय या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

नचिकेत वाल्हेकर यांनी दिला भाजपच्या मिसकॉल पार्टीचा राजीनामा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी भारतीय जनता पार्टीच्या मिसकॉल द्वारे घेतलेल्या सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे.

निष्ठा व पार्टी विथ डिफरंस हे बिरुद मिरवणारे आम्ही सगळे कार्यकर्ते खुप मेहनतीने लढत होतो पण या दरम्यान विरोधी विचारांच्या लोकांना फक्त सत्तेसाठी जवळ केले गेले आणि त्यातच विचारांचा विनाश झाला.

जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी आता मिसकॉल पार्टीचा राजीनामा देऊन बाहेरुन आलेल्या नेत्यांना पुन्हा बाहेर काढावे. सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा फॉर्म भरुन घ्यावा व फक्त संघ परिवारातून आलेल्या कार्यकर्त्यांनाच कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात यावे.

मी माझ्या नगर व महाराष्ट्रातील सर्व पार्टी सभासदांना आवाहन करतो की आजच मिस कॉल पार्टीचा राजीनामा द्यावा व आपल्या जुन्या भारतीय जनता पक्षाची घडण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिक माहितीसाठी मला या नंबरवर संदेश पाठवा 9579654546.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post