घराच्या लिलावाची नोटीस मिळताच मुंडेंनी भरले बँकेचे कर्ज


वेब टीम : पुणे
बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी पुण्यात सदनिका घेण्यासाठी तब्बल एक कोटी 43 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

कर्ज थकवल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने मुंडे यांच्या सदनिकेवर जप्तीची कारवाई करत त्यांना ठराविक मुदतीत रक्कम भरावी अन्यथा सदनिकेचा लिलाव केला जाणार असल्याची नोटीस बजावली होती.

मुंडे यांना नोटीस प्राप्त होताच त्यांनी मुद्दल आणि व्याजासहीत थकबाकी भरल्यामुळे सदनिकेचा ताबा पुन्हा मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

शिवाजीराव भोसले बँकेचे संचालक मंडळ रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आदेशानुसार बरखास्त करण्यात आले आहे. सहकार विभागाने बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

आर्थिक अनियमिततेमुळे या बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कारवाईनंतर बँकेने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मुंडे यांच्यावर चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात कारवाई करण्यात आली होती.

मुंडे यांनी पुण्यात मॉडेल कॉलनी येथे युगाई ग्रीन सोसायटीमध्ये चार वर्षांपूर्वी सदनिका खरेदी केली आहे. त्याकरिता बँकेकडून एक कोटी 43 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

त्यापैकी 70 लाख सहा हजार 886 रुपये थकीत होते. हे कर्ज वेळेत न दिल्यामुळे बँकेने त्यांना नोटीस पाठवली होती.

त्यानंतरही कर्जाचा हप्ता जमा न केल्याने त्यांच्या सदनिकेचा ताबा घेण्यात आला होता.

मुंडे यांनी संपूर्ण थकबाकी एकरक्कमी भरल्याने सदनिकेचा ताबा पुन्हा मुंडे यांना देण्यात आला असल्याची माहिती शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे प्रशासक नारायण आघाव यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post