चोराने केलेल्या गोळीबारात पोलीस जखमी


वेब टीम : अहमदनगर
राहता शहरातील मध्यवर्ती वस्तीतील चितळी रस्त्यावर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अट्टल सोनसाखळी चोरांनी 2 पोलिसांवर केलेल्या गोळीबारात एक पोलिस जखमी झाला आहे.

या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.

भर दुपारी थेट पोलिसांवरच गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

श्रीरामपूर येथील सोनसाखळी चोरीच्या टोळीतील आरोपी सचिन ताके व त्याचा साथीदार हे रुमालाने तोंड बांधून चितळी रस्त्यावरुन दुचाकीवर जात असताना पोलिस कॉन्स्टेबल अजित पठारे व रशिद शेख यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

त्यामुळे त्यांनी आरोपींना थांबण्याचा इशारा केला. परंतु त्यांनी दुचाकीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीने आपल्याजवळील गावठी पिस्तुलातून पठारे यांच्यावर गोळीबार केला.

त्यात पठारे जखमी झाले असून, त्याच्या हाताला, गालाला व मानेला गोळी चाटून गेली. त्या परिस्थितीतही शेख यांनी आरोपी ताके यास पकडले. परंतु या गडबडीत त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने आपल्या गावठी पिस्तुलातून दोन वेळा गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांनी भेट दिली असून, घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

फरार आरोपीचा पोलिस शोध घेत असून, जखमी पठारे यांना प्राथमिक उपचारासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post