जुन्या भाजप-शिवसेनेला ताकद द्या: हिंदुराष्ट्र सेनेचे पत्र


वेब टीम : अहमदनगर
नगर जिल्ह्यात पहिला भगवा फडकला तो नगर शहर आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये! त्या पाठोपाठ राहुरीच्या पोटनिवडणुकीत आणि पारनेरमध्ये. त्यातही नगर, कर्जत जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदार संघांवर भाजपा-शिवसेना युतीचे वर्चस्व होते.

या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्याची कारणे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहेत. सध्या जिल्ह्यात भाजपाचे 3 आमदार आहेत.

मात्र हे तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. सध्या मूळ भाजपा आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिले नसल्याचा विषय गंभीर आणि चिंतनाचा, तसेच चिंतेचा बनला असल्याचे हिंदुराष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई देशात आणि राज्यात हिंदुत्वाचेच सरकार असावे असे कार्यकर्त्यांना नेहमीच बजावत आले आहेत.

त्यांनी केलेले हिंदुत्वाचे संस्कार, दिलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची शिकवण आणि त्यातून मननाद्वारे मी नगर जिल्ह्यातील मूळ भाजपा आणि शिवसेनेला नवसंजीवनी देण्याची गळ आपणांस घालत आहे.

उपरोल्लेखित विषय आणि मतदार संघांतील पराभव हा मूळ भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मूळ भाजपा व शिवसेनेला नवसंजीवनीची गरज आहे.

विधान परिषद सभासदत्व आणि महामंडळांच्या माध्यमातून मूळ भाजपा व शिवसेनेच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना ताकत देऊन दोन्ही पक्षांना नवसंजीवनी द्यावी, असी मागणी गेंट्याल यांनी केली आहे.

मी हिंदुराष्ट्र सेनेचा जिल्हा अध्यक्ष असून स्वतःसाठी किंवा माझ्या संघटनेसाठी काहीही मागत नाहीय. केवळ हिंदुत्वाचा विचार, समविचारी राजकीय पक्षांवर असलेले प्रेम आणि तसेच वागण्याचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या संस्कारांतून ही मागणी करीत आहे, हे लक्षात घेऊन प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post