अयोध्या निकालानं कुणाचा जय-पराजय नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी


वेब टीम : दिल्ली
अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

’देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या खटल्यावर आपला निकाल दिला आहे. या निकालाकडे कुणाचा जय किंवा पराजय या दृष्टीनं पाहू नये,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

अयोध्या खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. तसंच देशवासियांनाही आवाहन केलं आहे.

’देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निकालाकडे जय-पराजय या दृष्टीनं पाहायला नको. रामभक्ती असो किंवा रहीमभक्ती, हा क्षण आपल्या सर्वांसाठी भारतभक्तीच्या भावनेला सशक्त करण्याचा आहे.

शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखण्याचं आवाहन मी देशवासियांना करतो,’ असं मोदी म्हणाले. ’सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अनेक अर्थानं महत्वपूर्ण आहे. एखादा वाद सोडवण्यात कायदेशीर प्रकियेचं पालन किती महत्वाचं आहे हे यातून दिसतं.

प्रत्येक पक्षकाराला आपापली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी देण्यात आली. न्यायमंदिरानं दशकांपासूनचे प्रकरण सौहार्दपूर्ण पद्धतीनं सोडवलं आहे,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली. या निकालामुळं न्यायप्रक्रियेवरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी मजबूत होणार आहे.

आपल्या देशाच्या हजारो वर्षे जुन्या बंधुभावाच्या भावनेनुसार 130 कोटी भारतीयांना शांतता आणि संयमाची ओळख करून द्यायची आहे, असंही मोदी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post