गेल्या सहा वर्षांमध्ये ९० लाख नोकऱ्यांवर गदा सोनिया गांधी


वेब टीम : दिल्ली
देश दिवसागणिक आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र, सभा-समारंभ आणि प्रसिद्धीच्या मोहात पडलेले दिसतात.

आर्थिक विकासाच्या झालेल्या घसरणीची कबुली देऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केंद्र सरकारला ती मान्यही नाही ही बाब चिंताजनक आहे, अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.

सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस ५ ते १५ नोव्हेंबर या काळात देशव्यापी आंदोलन करणार असून त्याच्या तयारीसाठी सोनिया गांधी यांनी नेत्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीत चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीतील विकासदर जेमतेम पाच टक्के आहे.

हा पाच वर्षांमधील सर्वात नीचांकी दर ठरलेला आहे. ही आकडेवारीच आर्थिक संकट किती गंभीर आहे हे दाखवते. मागणी कमी झाली आहे. गुंतवणूक होत नाही. त्यामुळे रोजगारनिर्मिती ठप्प झालेली आहे.

नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या सहा वर्षांमध्ये ९० लाख नोकऱ्यांवर गदा आली, असा शाब्दिक हल्ला सोनिया गांधी यांनी केला.

देशातील विविध संस्था दुबळ्या करण्याचे काम केले जात आहे. माहिती (डाटा) लपवला जातो वा त्यात फेरफार केला जात आहे. त्यामुळे आर्थिक विश्वासार्हताच धोक्यात आल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

सरकारी धोरणातील उणिवांना दाखवणाऱ्या आर्थिक तज्ज्ञांना हास्यास्पद बनवले जाते. वाहन उत्पादन, बँक क्षेत्र, उत्पादन, शेती अशा सगळ्याच क्षेत्रांना आर्थिक घसरणीचा फटका बसलेला आहे, असा मुद्दा सोनियांनी मांडत मोदी सरकारला धारेवर धरले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post