वेब टीम : पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०२० मध्ये घेतल्या जाणार्या दहावी-बाराव...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०२० मध्ये घेतल्या जाणार्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले.
बारावीची लेखी परीक्षा येत्या १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा येत्या ३ मार्च पासून घेतली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
राज्य मंडळातर्फे पुणे,नागपूर,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात.
शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या उद्देशाने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिध्द केले जाते.
त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक दिले होते.तेच वेळापत्रक अंतिम केल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.
इयत्ता बारावीची परीक्षा येत्या १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा येत्या ३ मार्च ते २३ मार्च या कालवधीत होईल.
परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने छापील स्वरुपात दिलेली वेळापत्रकेच अंतिम असतील. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी.
अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच व्हॉट्सअॅपवर किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरले जाऊ नये असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
COMMENTS