एसटीची हंगामी भाडेवाढ मागे


वेब टीम : मुंबई
एसटीने प्रवास करणार्‍यांसाठी खूशखबर आहे. एसटी महामंडळाने दिवाळीत केलीली हंगामी भाडेवाढ मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे बुधवारपासून एसटीचे नियमित तिकीट दर आकारण्यात येतील, असे एसटी महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

यंदा दिवाळीच्या सुट्टीत 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन) बससेवेसाठी मूळ तिकिटावर सरसकट 10 टक्के दरवाढ करण्यात आली होती.

या दरवाढीमुळे दररोज सुमारे 2 कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी एसटी महामंडळासाठी गोड ठरली आहे.

दरवर्षीच गर्दीच्या हंगामात महसूल वाढीसाठी एसटी महामंडळ हंगामी दरवाढ करीत असते. त्यासाठी ठराविक काळमर्यादा असते. दरवाढीची मर्यादा मंगळवारी मध्यरात्री संपत आहे.

त्यामुळे यंदा करण्यात आलेली हंगामी दरवाढ मागे घेण्यात आली आहे. बुधवारपासून एसटीच्या नियमित तिकीट दराची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहितीही महामंडळाने दिली.

दरम्यान, या काळात एसटीच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल एसटी महामंडळाने आभार मानले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post