शिवसेनेनं करून दाखवलं; आरे कारशेडच्या कामाला स्थगिती


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे.

‘रातोरात झालेली झाडांची कत्तल मंजूर नाही. मेट्रोच्या कामाला स्थगिती नाही, पण आरेमधल्या कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत.

पर्यायी मार्गाचा निर्णय होत नाही तोवर आरेमधलं पानही तोडता येणार नाही,’ अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघाकडून त्यांना सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘ तीन पक्षांचे सरकार चालवणे आणि मुख्यमंत्रिपद सांभाळणे हे मोठं आव्हान आहे. हे सरकार सर्वांचेच असून नम्रपणे वागणार आहे. जनतेच्या एकाही पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घेणार आहे,’ असं त्यांनी सांगितल.

यावेळी बोलताना, ‘इथे येण्याआधी मी मुख्यमंत्रीपदी येईन वगैरे असं काही सांगितलं नव्हतं. मी न सांगता मुख्यमंत्री झालोय,’ असा चिमटा त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता काढला.

सलग दोन दिवस उद्धव यांनी भगवा कुर्ता घातल्याने हा तुमचा आवडता रंग आहे का, असं पत्रकारांनी विचारलं.

 यावर ‘जन्मभर हाच रंग राहणार आहे. कुठल्याही लाँड्रीत गेलं तरी हा रंग धुतला जाणार नाही,’ असं उत्तर उद्धव यांनी दिलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post