बाळासाहेब थोरात होणार राज्याचे उपमुख्यमंत्री?


वेब टीम : मुंबई
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन उपमुख्यमंत्री असे सत्तेचे वाटप होऊ शकते. यामध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते.

राज्यात काँग्रेस बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढली होती. केंद्रातून मोठे नेते प्रचारासाठी उतरले नसतानाही काँग्रेसनं राज्यात चांगलं यश मिळवलं. बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रभर फिरून काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.

त्यामुळेच काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले आहेत. याचं श्रेय हे बाळासाहेब थोरातांना दिलं जातं, त्याचंच बक्षीस म्हणून बाळासाहेब थोरातांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिल्यानं त्यांना काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपद न देण्याचा विचारही होऊ शकतो. तसेच दोन माजी मुख्यमंत्र्यांपैकी एकाची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे काल झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम काय असावा, सत्तेचे वाटप कसे करावे, अधिकारी वर्ग कायम ठेवावा की बदलावा यांसह अनेक बारीकसारीक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी चर्चेद्वारे सर्व मुद्दे निकालात काढून येत्या दोन दिवसांत शिवसेनेशी बोलणी केली जातील, असे कळते. मंत्रिपदांच्या वाटपावर स्पष्टता झालेली नाही. शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post