निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही


वेब टीम : दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षेच राहणार आहे. निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सरकारने स्पष्ट केले. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

सध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी सांगितले. १ एप्रिल २०२० पासून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात काही बदल करू शकते,असे वृत्त होते.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हा संभ्रम दूर केला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लोकसभेतच लेखी उत्तरात माहिती दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे साठ वर्षे राहील हे स्पष्ट झाले.

‘मूलभूत नियम ५६ (जे), केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२च्या नियम ४८ आणि नियम १६ (३) (संशोधित) ऑल इंडिया सर्व्हिसेस (मृत्यू/निवृत्तीपश्चात लाभ) नियम, १९५८अंतर्गत तरतुदीनुसार सरकारला वेळेआधी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचा पूर्ण अधिकार आहे.

सरकार सार्वजनिक हितार्थ कर्मचाऱ्याला नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे. अशा प्रकरणात सरकार तीन महिन्यांहून कमी कालावधीसाठी नोटीस देऊ शकत नाही किंवा तीन महिन्यांचं वेतन आणि भत्ते देईल,’ अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post