अहमदनगर महापालिकेच्या स्वच्छता पुरस्काराचे वितरण; आता 'थ्री स्टार' रेटिंगचे लक्ष्य


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता विषय उपाययोजनांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती व प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिकेच्या उत्कृष्ट सफाई कर्मचार्‍यांचा व शहरातील शाळा, शासकीय कार्यालये, हॉस्पिटल व हॉटेल या आस्थापनांना स्वच्छता पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि.16) शानदार सोहळ्यात करण्यात आले. महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्वांना शुभेच्छा देतांनाच ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा दिला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतलेला असून, सर्वांच्या सहकार्याने आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचे आहे. ‘अब की बार, थ्री स्टार’ हा नारा व संकल्प महापालिकेने केला आहे. यात नगरकरांचा व नगरसेवकांचाही सहभाग आवश्यकच आहे. स्वच्छतेबाबत कुणीही तडजोड करु नये.
स्वच्छता ही केवळ मनपाची जबाबदारी आहे, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपले शहर स्वच्छ असावे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याबाबत सकारात्मक मानसिकता नागरिकांमध्ये तयार होण्याची गरज आहे. आज स्वच्छतेबाबत इंदोरचे उदाहरण दिले जाते. इंदोरमध्ये प्रत्येक नागरिक स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्याने तिथे हा बदल झाला आहे. शहरातील प्रत्येक नागरिक, नगरसेवकाने स्वच्छतेबाबत संकल्प करावा.
स्वच्छतेबाबत उपाययोजना करताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही कठोर उपाययोजनाही कराव्या लागतील. नगरसेवक, पदाधिकार्‍यांना आपापल्या भागातील नागरिक, मतदारांच्या नाराजीची काळजी असते. मात्र, नगरसेवकांनीही राजकारण न करता एकत्र यावे. स्वच्छतेबाबत आपल्या प्रभागात कोणतीही तडजोड करु नये. आपला प्रभाग शहरात सर्वोत्कृष्ट असावा, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. नगरसेवकांनी निरीक्षक म्हणून स्वच्छतेच्या उपाययोजनांवर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
महापालिकेने स्वच्छतेच्या लढाईत सहभाग घेतला आहे. लढाईत आपले सैनिक मजबूत असतील, तर विजयाची खात्री असते. त्यामुळे यात सर्वात मोठी जबाबदारी सफाई कामगारांवरच आहे. आज ज्यांना पुरस्कार मिळालेत, त्यांनी अधिक जोमाने काम करावे. कदाचित पुन्हा त्यांना पुरस्कार मिळतील. ज्यांना मिळाले नाहीत, त्यांनी इतरांकडून प्रेरणा घेऊन आपल्याला पुरस्कार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असेही द्विवेदी यांनी यावेळी सांगितले.
Manapa%2B2

महापौर वाकळे म्हणाले की, मागील वेळी सर्वेक्षणात आपल्याला सर्वात शेवटचा क्रमांक मिळाला होता. मात्र, यावेळी आपण सुरुवातच चांगली केली आहे. स्वच्छतेत सुधारणा होणे, हे कुणा एकाचे काम नाही. मात्र, कर्मचार्‍यांना आपले कर्तव्य पार पाडावेच लागेल. कुणी काम करत नसतील तर त्यांना प्रोत्साहित करा, अन्यथा कारवाई अटळ आहे, असा इशारा त्यांनी दिला. आपले काम अशाच पध्दतीने चांगले राहिले तर दोन महिन्यात आपण ध्येय गाठू शकतो. सर्वांच्या सहकार्याने आपण ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.
उपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या की, खासगी संस्थेमार्फत कचरा संकलनाचे काम सुरू झाल्यानंतर कचर्‍याच्या समस्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी कचर्‍याचा प्रश्न मार्गी लागला आहे. घंटागाड्यांवरुन गाण्यांद्वारे जनजागृती होत असून, नागरिकांकडून याचे स्वागत केले जात आहे. कर्मचार्‍यांच्या गुणगौरव सोहळ्यामुळे त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, सर्व कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी व नगरकरांनी एकत्र येवून ‘अब की बार, थ्री स्टार’चे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. सर्वांच्या सहकार्यानेच शहर स्वच्छ होणार आहे.
उपायुक्त सुनील पवार म्हणाले की, स्वच्छतेबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्या कराव्यात. तक्रारींमुळे व त्यातून मिळणार्‍या माहितीमुळे नियोजन योग्य करता येईल. स्वच्छता रँकींगमध्ये सुधारणा केल्यास शहराला 11 कोटींचे पारितोषिक मिळणार आहे. त्यामुळे ‘अब की बार, थ्री स्टार’चे उद्दिष्ट गाठायचे असा निर्धार आपण सर्वांनी करायचा आहे.
IMG-20191214-WA0015
कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे म्हणाले की, स्वच्छतेसाठी मनपाने सुरू केलेल्या उपाययोजनांमध्ये आमचे संपूर्ण सहकार्य राहील. शहरात चांगले वातावरण महापौर व जिल्हाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे निर्माण झाले आहे. युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी सर्व उपक्रमांमध्ये संपूर्ण सहकार्य देतील. शहरात सफाई कामगार राहात असलेल्या परिसरांमध्ये, स्लम एरियांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रास्ताविकात डॉ. अनिल बोरगे यांनी उपक्रमाची व सर्वेक्षणाची माहिती दिली. महापालिकेकडून शहरात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्लॅस्टिक बंदी शासनाने केलेली आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही करत आहोत. आठवडाभरात अडीच लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. या दंडाच्या रकमेचा वापर सफाई कर्मचारी, मुकादम व स्वच्छता निरीक्षकांच्या कल्यणासाठी केला जाणार आहे. 

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तशा सूचना दिल्या आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबत नियोजन केले जाणार आहे.
नागरिकांना स्वच्छता विषयक आवाहन करतांना, होम कंपोस्टिंगचे आवाहन करतांना सुरुवात स्वतःपासून करावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मनपा कर्मचार्‍यांना होम कंपोस्टिंगचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद कर्मचारी देत आहेत. अभियंता परिमल निकम यांनी चांगला उपक्रम राबविला आहे. सर्वांसाठी तो आदर्श ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post