अहमदनगर : कांद्याला २५ ते १०० रुपयांचा मिळाला भाव


वेब टीम : अहमदनगर
नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी (दि.26) झालेल्या लिलावाच्या वेळी कांद्याची विक्रमी आवक झाली. शेतकर्‍यांनी तब्बल 1 लाख 15 हजार गोण्या कांदा विक्रीसाठी आणला होता.

विशेष म्हणजे विक्रमी आवक होवूनही कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाच्या कांद्याला विक्रमी 100 रुपये किलोचा भाव मिळाला. तर इतर कांद्याच्या प्रतवारीनुसार 25 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

गेल्या 2 महिन्यापासून कांद्याची आवक कमी होत आहे, तर देशभरात कांद्याची मागणी होत आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्याभरापासून कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील काही दिवसात कांद्याचा भाव साधारणपणे 82 रुपयांपर्यंत गेला होता.

दि.30 नोव्हेंबरपासून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले आहेत. पहिल्याच लिलावात गावरान कांद्याला 82 रुपये तर लाल कांद्याला 62 रुपये दर मिळाला होता.

दुसर्‍या लिलावातही कांद्याला मागणी असल्याने कांदा व्यापार्‍यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली. चांगल्या दर्जाच्या गावरान कांद्याला उच्चांकी भाव क्विंटलला 10 हजार रुपये तर लाल कांद्यालाही क्विंटलला 10 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तेव्हापासून हे भाव स्थिर असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे, निरीक्षक जयसिंग भोर व संजय काळे यांनी सांगितले.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत असल्याने देशभरात हा कांदा विक्रीला जातो. गुरुवारच्या लिलावाच्या वेळी कांद्याची विक्रमी 1 लाख 15 हजार गोण्या आवक होवूनही चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post