अहमदनगर - पुणे महामार्ग १ जानेवारीला राहणार बंद


वेब टीम : अहमदनगर
कोरेगाव भीमा व पेरणे फाटा (ता. शिरुर) येथे होणार्‍या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 1 जानेवारी रोजी पुणेनगर रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. त्या दिवशी पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा येथे दि. 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीमुळे यावर्षी अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पेरणे फाटा, कोरेगाव भीमा परिसरात येणार्‍या समाजबांधवांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परिसरातील काही किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

1 जानेवारी 2020 रोजी अहमदनगर बाजूने पुण्याच्या दिशेने येणारी सर्व वाहने शिक्रापूर चौकातून चाकणमार्गे, पुणे बाजूने अहमदनगरकडे जाणारी वाहने येरवडा, आळंदीमार्गे चाकण- शिक्रापूर दिशेने तसेच खराडीमार्गे हडपसर, केडगाव चौफुलामार्गे शिरूरच्या दिशेने, नगर बाजूने हडपसरच्या दिशेने येणारी सर्व जड वाहने न्हावरा फाटा तसेच केडगावमार्गे वळविण्यात येणार आहेत.

तसेच पेरणे फाटा येथे अभिवादनासाठी येणार्‍या बांधवांसाठी कोरेगाव भीमा, पेरणे फाटा येथून काही अंतरावर ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून स्वतंत्र बसची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील गावांमध्ये येणार्‍या समाजबांधवांचे ग्रामस्थांच्यावतीने विशेष स्वागत देखील यावेळी करण्यात येणार आहे. तर दि. 1 जानेवारी रोजी नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post