उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं; शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे सरसकट कर्ज माफ


वेब टीम : मुंबई
दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे बिना अटी सरसकट कर्ज माफ केले आहे.

राज्य सरकारने नियमित कर्जाचे हफ्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील लवकरच मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ही इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असणार असल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांचे कर्ज ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत आहे, ते सर्व थकीत कर्ज २ लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती घालण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाऊन हेलपाटे घालावे लागणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने सरसकट कर्ज माफीचे दिलेले वचन पूर्ण केलेले नसल्याचे सांगत सभात्याग केला. सरकारने सात बारा कोरा करण्याचे सांगितले होते ते देखील केले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा कोणत्याही अटी शर्ती सोडून असलेला आहे. शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी रांगेत उभं राहायची गरज नाही. सरकारी कार्यालयात हेलपाटे घालायची गरज नाही.

थेट खात्यात पैसे येणार आहेत. आम्ही जे बोललो ते केले. कर्जमाफीचा अखेरचा आकडा जेव्हा येईल तेव्हा ही कर्जमाफी सर्वात मोठी कर्जमाफी ठरेल, असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post