५ डिसेंबरपासून देवगडला श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन


वेब टीम : अहमदनगर
भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त जयंती सोहळ्यास 5 डिसेंबर पासून प्रारंभ होत असून 12 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या दत्त जन्म सोहळ्याची जय्यत तयारी श्री क्षेत्र देवगड येथे सुरु झाली आहे.

या सोहळ्यात विविध धार्मिक कार्याचे आयोजन करण्यात आले आहे.श्री दत्त जन्माचा सोहळा 11 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.

श्रीक्षेत्र देवगड येथील गुरुदत्त पिठाचे निर्माते समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने सुरु झालेल्या व महाराष्ट्र देशामध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त जन्माचा सोहळा वैभवशाली पद्धतीने श्री क्षेत्र देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

यावर्षी हा सोहळा 5 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त पहाटे 4 ते 4.30 मंगलवाद्य सनई, चौघडा वादन 4.30 ते 6.30 काकडा भजन व श्रींची प्रातःआरती, सकाळी 6.30 ते 7.30 दर्शन प्रदक्षिणा, 7.30 ते 8.30 गीतापाठ व विष्णू सहस्त्रनाम, 9ते 11 सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 1ते 3 या वेळेत समयानुसार गुणवंतांचे कार्यक्रम 3 ते 5 सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी 5ते 7 या वेळेत हरिपाठ व श्रींची सायन आरती दर्शन तर रात्री 8.30 ते 10.30 यावेळात कीर्तन होणार असून यामध्ये खोकर येथील ह.भ.प.सेवनाथ महाराज, आळंदी येथील ह.भ.प.श्रीनिवास महाराज, माऊली महाराज कदम, नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख, वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथील ह.भ.प.चंदिले नाना महाराज, परळी येथील केशव महाराज उखळीकर यांच्या कीर्तनाचा या सोहळ्यात समावेशआहे.

बुधवार 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता देवगड मंदिर प्रांगणात भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा हजारो भाविक व संतमहंतांच्या उपस्थितीत व प्रवरामाईच्या साक्षीने साजरा होणार आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने श्री दत्त जयंती सोहळ्याची सांगता होणार आहे. या निमित्त होणार्‍या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे. मंदिर परिसर मंगलमय होण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट व सुशोभीकरण करण्यात येणार आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post