देशभरातील कामगारांचा ८ जानेवारीला देशव्यापी संप


वेब टीम : अहमदनगर
देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची समस्या व कामगार विरोधी धोरणा विरोधात 8 जानेवारी 2020 रोजी देशातील कामगार, कर्मचार्‍यांनी लाक्षणिक देशव्यापी संप पुकारला असून, या संपात महाराष्ट्रातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहे. या संपाची नोटीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे, विलास पेद्राम, श्रमिक संघटनेचे कॉ. बाबा आरगडे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, नंदू डहाणे, भाऊसाहेब डमाळे, पी. डी. कोळपकर आदींसह सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, शिक्षक व विविध क्षेत्रातील कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

केंद्र सरकार कामगार विरोधात मालक धार्जिणे धोरण राबवित आहे. खासगीकरण व कंत्राटीकरणासह जनता व कामगार विरोधी धोरण राबविण्याचा केंद्र सरकारने जणू चंगच बांधला आहे. त्यामुळे देशातील जनता व कर्मचारी निराशा असून, ते उद्रेक होण्याच्या मार्गावर आहेत.

आर्थिक प्रश्‍न केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची बाब प्रत्येक नागरिकाच्या मनात सलत आहे. कामगार, कर्मचारी एक अनामिक भयगंड मनात ठेवून जगत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य स्तरावरील सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशातील 20 कोटी कामगार कर्मचारी 8 जानेवारी रोजी लाक्षणिक संपावर जात आहेत. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, कर्मचारी यांचे जीवनमान उंचावणे यातच देशवासीयांचे कल्याण आहे.

त्यामुळे बदलत्या काळातील सरकारची धोरणे सर्वांसाठी हितवर्धक राहणे आवश्यक असून, याद्वारे देशाचा विकास साधला जाणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post