शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का नाही केला? : रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


वेब टीम : पुणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफीसाठी पैसा कुठून आणणार?, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का नाही केला? असा सवाल रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

रिपाइंच्या कार्यकारिणीची आज रविवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा सवाल केला.

ठाकरे सरकारने मागासवर्गीय महामंडळांची कर्जमाफी करावी, अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महामंडळावरील नियुक्त्या बरखास्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, असा इशाराही आठवलेंनी दिला.

काँग्रेस आणि शिवसेनेत वीर सावरकरांवरून मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेने वेगळे झाले पाहिजे, असे ते म्हणाले. सीएए मुस्लिमविरोधी नसून, मुस्लिमांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रिपाइंने एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहितीही यावेळी आठवले यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post