आम्ही नेहरू, गांधींनाही मानतो, सावरकरांचा अवमान करू नका : संजय राऊत


वेब टीम : मुंबई
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे दैवत आहेत. इथे तडजोड केली जाणार नाही, अशा आशयाचे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी केले.

काँग्रेसच्या ‘भारत बचाओ’ रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज भाजपवर घणाघाती टीका केली. मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नसून, राहुल गांधी आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

या पृष्ठभूमीवर खा. संजय राऊत यांचे हे ट्विट आल्याने आता महाराष्ट्रात सत्तारूढ महाविकास आघाडीत सामील काँग्रेस काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडीमुळे काँग्रेस आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली आहे.

देशातील बलात्काराच्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ असा उल्लेख केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर राहुल गांधींनी सदर वक्तव्य केले होते.

नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे.

आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे, असे ट्विट करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना आज सुनावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post