एल्गार परिषद प्रकरण : ... तशी पुस्तके माझ्याही घरात आहेत : शरद पवार

फाइल फोटो

वेब टीम : पुणे
एल्गार परिषदेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद आहे. केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून बऱ्याच जणांना अटक केली.तशी पुस्तके माझ्याही घरात आहेत.

केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणे योग्य नाही. पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसते,’ असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

पुण्यात पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते

पुण्यातील एल्गार परिषदेतून सामाजिक सौहार्द बिघडवल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांनी बऱ्याच लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. काहींना अटकही केली होती. आजही त्यापैकी काहीजण न्यायालयीन लढाई लढत आहेत. शरद पवार यांनी या कारवाईबद्दल शंका उपस्थित केली.

‘एल्गार परिषदेत दडपशाहीविरोधात आवाज उठवला होता. नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या गेल्या होत्या. विद्रोही विचारांच्या कविता वाचन किंवा घरात नक्षलवादी साहित्य वाचन, हा काही अटकेचा आधार होऊ शकत नाही. माझ्याही घरात नक्षलावादाशी संबंधित साहित्य आहे.आम्हीही माहिती घेत असतो.

वाचन करणाऱ्यांकडे अशी पुस्तके असतातच. याचा अर्थ ते नक्षलवादी आहेत असा होत नाही,’ असे पवार म्हणाले. ‘लोकशाहीत तीव्र भावना मांडल्या जातात. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तसे झाले होते.मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचा खटला टाकला नव्हता,’ याची आठवणही त्यांनी दिली.

‘एल्गार प्रकरणात सत्तेचा पुरता गैरवापर झाला आहे. दलितांसाठी काम करणाऱ्यांवर कारवाई केली गेली’,असे म्हणत, पवारांनी पोलीस कारवाईला बळी पडलेल्या कार्यकर्त्यांची नावच वाचून दाखवली.सुधा भारद्वाज, गडलिंग, वरवरा राव, कॉ. ढवळे हे सगळे लोक दलित, शोषितांसाठी काम करतात. त्यांच्यावर कारवाई केली गेली.

पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणली. पोलिसांचे वागणंही आक्षेपार्ह होतं. आजी किंवा माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांना मी तशी विनंती करेन,’ असे पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post