सावरकरांनी माफीसाठी नाही तर शिक्षेत सूट मिळण्यासाठी अर्ज केला होता : मोरे


वेब टीम : नांदेड
सावरकरांचे विरोधक अकारण ‘माफीवीर’ म्हणून त्यांची हेटाळणी करतात. सावरकरांना १९१० मध्ये दुहेरी जन्मठेप झाली. अंदमानची शिक्षा अत्यंत कठोर होती. त्या जेलमधील अनेक कैद्यांनी आत्महत्या केली. सावरकरांच्या मनातही आत्महत्येचा विचार आला, पण त्यांनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवले.

कैद्यांनी आत्महत्या करू नये, कायद्यानुसार शिक्षेसाठी सूट मागावी, उर्वरित आयुष्यात देशकार्य करावे असे त्यांना वाटत असे. सावरकरांनी १९११ ते १९१८ पर्यंत पाच अर्ज केले. त्यात केलेल्या क्रांतिकारी कृत्यासाठी माफी मागितली नव्हती. उर्वरित शिक्षेसाठी सूट मागितली होती. परंतु त्या अर्जाच्या विरोधात अभिप्राय जात असत. त्यामुळे त्यांची सुटका झाली नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी माफी मागण्यासाठी कधीही ब्रिटीश सरकारकडे अर्ज केला नाही. कायद्यानुसार उर्वरित शिक्षेसाठी सूट मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केला होता, अशी माहिती सावरकरांचे गाढे अभ्यासक व अंदमान येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांनी दिली.

सावरकरांवर देशात सुरू असलेल्या वादाबाबत मोरे यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

सावकरांनी केलेले अर्ज स्वत:च्याच सुटकेसाठी नव्हते. अंदमानातील इतर राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी त्यांनी अर्ज केले. १९१४ मध्ये त्यांनी केलेल्या अर्जात लिहिले होते की, शासनाला असे वाटत असेल की हे माझी स्वत:ची सुटका व्हावी यासाठी आहे तर मला मुळीच सोडू नये. माझ्याशिवाय अन्य सर्वांना सोडून द्या. यामुळे मला अत्यानंदच होईल.

सावरकरांनी १९१७ च्या अर्जात लिहिले होते की, सर्वांची सुटका करण्यासाठी माझा अडथळा येत असेल तर राजक्षमेतून माझे नाव वगळून टाकावे. अन्य सर्वांची सुटका करावी. त्यामुले मला माझीच सुटका झाल्याचे समाधान मिळेल. १९२० च्या अर्जात त्यांनी लिहिले होते की, शेकडो राजकीय कैद्यांना मुक्त करून शासनाने माझ्या १९१४ ते १९१८ या कालावधीतील आवेदनांची काही प्रमाणात पूर्तता केल्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो.

राजक्षमेसाठी अर्ज करण्यास कोणी तयार नसे. ही शरणागती ठरेल असे मानले जात असे. परंतु सावरकर त्यांना पटवून देत की, पुन्हा राज्यक्रांतीचा प्रयत्न वा राजद्रोह करणार नाही, अशी अट मान्य करून सुटका करून घेणे हेच राष्ट्रहिताचे आहे. येथे सडत राहणे व मरून जाणे यात राष्ट्रहीत नाही. या भूमिकेत चूक काय आहे, असा प्रश्नही मोरे यांनी उपस्थित करत सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर खेद व्यक्त केला.

मोरे म्हणाले की, सावरकरांचे माफीनामे आम्ही शोधून काढले असा दावा त्यांचे विरोधक करतात, हे साफ चूक आहे. १९२३ साली लिहिलेल्या अंदमानच्या अंधेरीतून या पुस्तकात त्यांनी दयेच्या अर्जाबाबत विस्तृत माहिती दिली. माझी जन्मठेप या आत्मचरित्रातही त्यांनी दयेच्या अर्जाबाबत विस्तृत भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी काहीही लपवले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सावरकरांनीही दयेचे अर्ज करीत ब्रिटीश सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामागे राष्ट्रभक्तीच होती. स्वत:चे हीत नव्हते. सुटका झाल्यानंतरही त्यांनी प्रपंच केला नाही. तर समाज व राष्ट्रकार्यच केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post